मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांवर आता अर्थसंकट ओढावले आहे. ऐन गुढीपाडव्याला दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुढी पाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी सराफा व्यावसायिक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
सोने - चांदीच्या भावात मोठी घसरण
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सराफा बाजार तेजीत असतो. सर्वसामान्य सणासुदीच्या निमित्ताने सोन्या-चांदीची खरेदी करतात. परंतु यावर्षीसुध्दा कोरोनाने व्यापाऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. सध्या सोने-चांदीच्या भावात चांगलीच घसरणही पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असे मत सराफा व्यापारी व्यक्त करत आहेत.
सोन्यातील गुंतवणूकीचे प्रमाण कमी
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६५०८ रुपये असून त्यात ८५ रुपयांची किंचित घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६७९४ रुपये असून त्यात १८९ रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीमध्ये देखील मोठी घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६७ हजारांखाली स्थिरावला. बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६६९६१ रुपये झाला त्यात ५४० रुपयांची घट झाली. तत्पूर्वी चांदीचा भाव ६६३७१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता. जागतिक बाजारात मात्र सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १७४०.५७ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २५.१९ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली आहे. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि चिनी अर्थव्यवस्था सावरत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहेत.