मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात गेल्या काही महिन्यांपासून कामाने वेग घेतला आहे. वरळी येथे इमारत उभी करण्याचे काम सुरू असून प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. नाम जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्याच्या इमारती पाडण्यात आल्या आहे. तेथेही नवीन इमारत उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे. नायगाव येथेही काही इमारतींचे पाडकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीच्या बांधकामासाठी वेगाने हालचाली होत आहेत. मात्र पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर रहिवाशांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. बीडीडी चाळ परिसरातील झोपडीपट्टी धारक आणि स्टॉल धारक यांचा प्रश्न मात्र आता प्रलंबित राहिला आहे. वास्तविक सरकारने स्टॉल धारक आणि झोपडपट्टी धारक यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला स्टॉल धारकांनी विरोध दर्शवला आहे.
सरकारने सहानुभूतीने विचार करावा : दरम्यान नायगाव वरळी आणि नाम जोशी मार्ग येथील स्टॉल धारक संघटनेने 160 चौरस फुटाऐवजी 300 चौरस फुटाचे गाळे देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी स्टॉल धारकांची संघटना न्यायालयात सुद्धा गेली आहे. त्यामुळे या प्रश्न सरकारने त्यांची बाजू समजून घेऊन सहानुभूतीने निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.
सर्व झोपडपट्टी धारकांना सामावून घ्यावे : नायगाव येथील झोपडपट्टी धारक अनेक वर्षांपासून तेथे राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या सरसकट सर्व झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन प्रकल्पात सामावून घ्यावे. तसेच या झोपडपट्टी धारकांचे आणि स्टॉल धारकांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच करावे, वरळीत प्रस्तावित आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. त्यानुसार सरकारने निर्णय घ्यावा या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आपण लवकरच भेट घेऊन एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नायगावचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात येणाऱ्या चाळींसोबतच वरळी येथे 271 झोपड्या, नायगाव येथे 120 झोपड्या, तर नाम जोशी मार्ग येथे 27 अशा एकूण 418 झोपड्या अस्तित्वात आहेत. तर या तीनही प्रकल्पात मिळून अधिकृत आणि अनधिकृत असे 600 पेक्षा अधिक स्टॉल आहेत.
कसे होणार पुनर्वसन? या तीनही बिल्डिंग चाळीतील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन वरळी येथील मंजूर आराखड्यातील स्वतंत्र झोपडीधारकांसाठी असलेल्या प्लॉट जीमध्ये बांधण्यात येणाऱ्या 22 मजल्याच्या इमारतीत करण्यात येणार आहे. तसेच वरळी येथे तीनही बिल्डिंग चाळ परिसरातील स्टॉल धारक आणि झोपडीधारक यांच्या पुनर्वसनासाठी आराखड्यात नियोजन करण्यात आलेल्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. झोपडीधारकांच्या इमारतीसाठी नायगाव दादर येथे पुनर्वसन करणे शक्य होणार नाही, असेही शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
झोपडी धारकांनाही पर्यायी घरे : दरम्यान बीड चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना ज्याप्रमाणे पुनर्वसन कालावधीत पर्यायी तात्पुरता स्वरूपात संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या चाळीमधील पाक पात्र झोपडीधारकांना सुद्धा संक्रमण शिबिरात पुनर्वसन इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत पर्यायी घरे देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या पात्र झोपडीधारकांना सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे भाडे देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
झोपडीधारकांसोबतही करारनामा : दरम्यान म्हाडाच्यावतीने झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेच्या इमारतीचा प्रारूप करारनामा अंतिम करण्याची बाब प्रलंबित आहे. हा करारनामा अंतिम झाल्यानंतर चाळीतील रहिवाशांप्रमाणेच झोपडीधारकांसोबतही 300 चौरस फूट पुनर्वसन सदनिकेचा करारनामा करण्यात येईल. तोपर्यंत बांधकाम सुरू करण्यात आलेल्या टप्प्यांमध्ये बाधित झोपडीधारकांना आश्वासन पत्र देण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.