मुंबई - मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करणारा अजून जन्माला आला नाही. मुंबई शहरात मराठी टक्का आजही नंबर एक असला तरी तो घटत चालला आहे, हे वास्तव आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन मराठी माणसाचा टक्का कसा वाढेल याचा विचार करायला हवा असे मत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतत मराठी माणसासाठी लढा दिला, मराठी माणसाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केला. हे करत असताना मराठी माणूस मुंबई शहरात स्थिरावला. आजही उद्धव ठाकरे मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शिवसेना मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होऊ देणार नाही. इतर भाषिकांची ज्या प्रमाणात मुंबईतील संख्या वाढत आहे. तिथल्या राज्यकर्त्यांनी त्या-त्या ठिकाणी विकास केल्यास स्थलांतराची संख्या कमी होईल. तेथील स्थानिकांना तेथेच रोजगार मिळेल. मराठी माणसाला हद्दपार करणारा आजपर्यंत कोणीही जन्माला आला नाही. आम्ही राजकीय व्यवस्थेसाठी घाबरत नाही, आम्हाला मराठी माणसाबद्दल आपुलकी व जिव्हाळा आहे, असे महाडेश्वर यांनी सांगितले.