मुंबई: राज्य शासनाच्या विविध 43 खात्यांतर्गत हजारो पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांवर भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी एक जून पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सुमारे अडीच महिन्यात 75 हजार जागांची भरती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरती प्रक्रियेसाठी कंपन्यांची नियुक्ती: भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सद्यस्थिती आणि बेरोजगारी डोळ्यासमोर ठेवून हा मेगा भरतीचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कालबद्ध पद्धतीने 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती करण्यात येणार असून तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. त्यानुसार लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब क आणि गट ड पद भरतीसाठी आता टीसीएस आणि आयबीपीएस या खाजगी कंपन्यांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागातील रिक्त जागा आणि भरती : महसूल, कृषी, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, सामाजिक न्याय, ग्रामविकास, गृह आणि गृहनिर्माण, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, महिला आणि बालकल्याण या विभागात भरती होणार आहे. तसेच जिल्हा परिषदा एकूण 18 हजार 931 जागा रिक्त आहे. शिक्षण विभाग 67 हजार पदे रिक्त तर महिला बालकल्याण अंगणवाडी सेविका मदतनीस वीस हजार पदे रिक्त आहेत. तसेच तलाठीच्या 3628 जागा रिक्त आहे. वनविभागात 9640 जागा रिक्त आहेत. ग्रामविकास विभागात, ग्रामसेवकाचे दहा हजार पदे रिक्त आहेत.
शिक्षकांची पदे त्वरित भरण्यात येणार: दरम्यान राज्यातील 67 हजार रिक्त शिक्षकांच्या पदांसाठी 2022 - 23 ची संच मान्यता लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपालिका सह खाजगी अनुदानित शाळातील शिक्षकांची सुमारे 32 हजार पदे त्वरित भरण्यात येणार असल्याचे, या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया सरकारने नोव्हेंबर 2022 मध्ये 4000 पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही जाहिरात निघालेली नाही. तसेच वनविभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या भरतीची ही जाहिरात निघाली नसल्याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिली.
सरकारने प्रक्रिया लवकर राबवावी : दरम्यान राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत. त्यामुळे सरकारमध्ये असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन जनतेला अधिकाधिक सुविधा मिळतील. त्यासाठी सरकारने आता वेळ न दवडता भरती करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग दी कुलथे यांनी केली आहे.
हेही वाचा -