मुंबई - राज्यात मंगळवारी १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
याआधी 26 एप्रिलला गाठला होता उच्चांक -
महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी २६ एप्रिलला एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनची लस ७७.८ टक्के लस कार्यक्षम; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक -
आतापर्यंतचा लसीकरणाचा हा उच्चांक आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.