मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान ( statements on Shivaji Maharaj) केले. तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) तसेच कर्मविर भाऊराव पाटील यांच्या विषयी वक्तव्य केले या मुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. यासह विविध मुद्द्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विरोधी महाविकास आघाडीने हल्ला बोल महामोर्चा करत निषेध केला आहे.
संजय राऊतांचा मोठा इशारा : महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल व शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आजच्या विराट मोर्चाने राज्यपालांना डिसमिस केले आहे. तसेच शिंदे-फडवणीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशाराही या महामोर्चाने दिला आहे. आजचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्याचे पहिले पाऊल आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असे देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नसेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
उद्धव ठाकरेंचा प्रहार : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामोर्चात वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांविरोधात जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आज निघालेला हा महामोर्चा महाराष्ट्र द्रोह्यांचा शेवट करणारा मोर्चा आहे. महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार अशा लफंग्यांना नाही. भगतसिंह कोश्यारींना आम्ही राज्यपाल मानत नसल्याचे ते म्हणाले. महामोर्चात त्यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नाना पटोलेंची भाजपवर टीका : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज महामोर्चात सहभागी झाले होते. ते मोर्चा दरम्यान बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सीमावादावरून राज्यातील अनेक गावे परराज्यात जाण्यासाठी मागणी करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी महामोर्चात केला आहे.
शरद पवारांची राज्यपालांना हटविण्याची मागणी : महाविकास आघाडीच्या महामोर्चात (Mahavikas Aghadi Morcha) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर हल्लाबोल ( Sharad Pawar in Mahavikas Aghadi Morcha ) केला आहे. ते म्हणाले की, आज आपण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचे नाव आज साडेतीनशे वर्षे झाले तरी अखंड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशार शरद पवार यांनी दिला आहे. दरम्यान, महापुरूषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा, अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
फडवणीस म्हणाले, हा नॅनो मोर्चा : महाविकास आघाडी सरकारच्या महामोर्चावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadnavis on Mahamorcha ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या महामोर्चा विषयी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी या मोर्चाला नॅनो मोर्चा असे संबोधले आहे. त्याचबरोबर जे स्वतः वारंवार देवी - देवता, संत, महापुरुषांचा अपमान करत आहेत त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकारच नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
मुद्दे संपल्यामुळे मविआचा मोर्चा : महाविकास आघाडीच्या महामोर्चा विषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा राजकीय दृष्ट्या काढलेला मोर्चा होता. जे वारंवार देवी- देवता, संत, महापुरुषांचा अपमान करतात तेच मोर्चा काढतात. त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. तसेच मुद्दे संपल्यामुळे महाविकास आघाडीचा हा मोर्चा होता, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. तसेच तीन पक्षांनी एकत्र येऊन काढलेला हा मोर्चा आणि त्याचबरोबर राज्यभरातून या मोर्चासाठी बोलवण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पाहता हा मोर्चा फार मोठा असायला हवा होता आझाद मैदान पूर्णतः भरून जायला हवे होते पण तसे झाले नाही. हा मोर्चा पूर्णतः अयशस्वी असा मोर्चा होता. तसेच काँग्रेसने जेव्हा सावरकरांचा अपमान केला तेव्हा मोर्चा का नाही काढला? असा प्रश्नही फडवणीस यांनी उपस्थित केला.
मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद : भायखळा येथील जेजे रुग्णालयाजवळील कंपनीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका सभेने होत आहे. मोर्चाला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांच्या हातात बॅनर, फलक, शिवाजी महाराज आणि फुले यांच्या प्रतिमा दिसत होत्या. तत्पूर्वी, राज्यभरातून तीनही पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. कार्यकर्त्यांनी ईटीव्ही भारतबरोबर संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.