मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. 16 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधानुसार बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. जूनच्या तिमाहीत 112 कोटी रुपयांचा तोटा आणि सप्टेंबरच्या तिमाहीत 397 कोटींचा तोटा दर्शविणाऱ्या लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंधने घालण्यात आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत बिघडणारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणि संचालक मंडळाकडून करण्यात आलेले निष्फळ प्रयत्न यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकूण 30 दिवसांसाठी हे निर्बंध राहणार आहेत.
बचत आणि चालू खातेधारकांवर होणार परिणाम -
या बँकेत बचत खाते असलेल्या ग्राहकांना महिन्याला 25 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच चालू खातेधारकांना खात्यांमधून केवळ 50 हजार रुपये काढता येणार आहेत. चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या लक्ष्मीविलास बँकेचे देशभरामध्ये 563 शाखा आहेत. तर तब्बल 20 हजार 973 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. मात्र, कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये गेल्या जून आणि सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. त्यामुळे रिझर्व बँकेकडून 30 दिवसांसाठी ही बंधने घालण्यात आलेली आहेत .
संचालक मंडळाच्या जागी हे असणार प्रशासक-
कॅनरा बँकेचे माझी नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन टीएन मनोहरण यांना लक्ष्मीविलास बँकेच्या प्रशासक पदी नेमण्यात आलेले आहे. या बँकेच्या संचालक मंडळाकडून बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल रिझर्व बँकेकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर रिझर्व बँकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. लक्ष्मीविलास बँकेचा गेल्यावर्षीचा एनपीए हा 17.30 टक्के असताना जून 2020 मच्या जूनपर्यंतचा एनपीए हा 25.40 टक्क्यांपर्यंत गेल्यामुळे ही बँक आर्थिक संकटात आली आहे.
ग्राहकांच्या ठेवी सुरक्षितच-
रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून लक्ष्मीविलास बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधामुळे बँकेच्या ठेवीधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर बँकेच्या ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असून ग्राहकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे, रिझर्व बँकेकडून स्पष्ट करण्यात आलेले आहेत.