मुंबई - पीएमसी बँकेनंतर आता येस बँक बुडीत निघाली आहे. एका मागोमाग एक बँका बुडीत निघत आहेत. त्यामुळे खातेदारांचे आणि गुंतवणूकदारांचे पैसे बँकांमध्ये अडकून राहत आहेत. मुंबई महापालिकेच्याही सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 79 हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. त्यामुळे सरकारी बँकांमध्येच मुदत ठेवी ठेवाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. हा पैसा मुंबईकर करदात्यांचा असल्याने त्याची काळजी महापालिकेने घ्यावी, असेही रवी राजा यांनी सांगितले.
हेही वाचा - सत्ताधाऱ्यांकडून एका विशिष्ठ समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न - शरद पवार
मुंबई महानगरपालिकेची श्रीमंत महापालिका म्हणून ओळख आहे. पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला, कंत्राटदारांची डिपॉझिटची रक्कम आदी रक्कमा विविध बँकांमध्ये मुदत ठेवी म्हणून ठेवल्या जातात. ज्या बँकांमध्ये जास्त व्याज दिले जाते, अशा स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनलल बँक, बँक ऑफ इंडिया, यूको बँक, आयसीआयसीआय, एक्सिस बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आदी 9 सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 31 जानेवारीला 78 हजार 919.78 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वीच पीएमसी बँकेत अनियमितता असल्याने पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता येस बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध घातले आहेत. येस बँकेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तब्बल 800 कोटी रुपये अडकले आहेत. करोडो रुपये अडकल्याने महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांना पगार देणे अडचणीचे झाले आहे. याबाबत बोलताना येस बँकेची आर्थिक परिस्थिती खराब आहे. या बँकेत पालिकेचे किती रुपये मुदत ठेवी म्हणून ठेवल्या आहेत, याची माहिती सध्या नाही. मात्र, यापुढे ज्या बँकांचा व्यवहार संशयास्पद आहे, अशा बँकांमधील पालिकेने आपल्या मुदत ठेवी काढून राष्ट्रीय बँकेत ठेवाव्यात, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
हेही वाचा - मनसेचा आज वर्धापन दिन, शॅडो कॅबिनेटची होणार घोषणा