मुंबई : नवा पक्ष वंचित बहुजन आघाडी यात सामील झाल्याने आता सध्या चार पक्षांचे नेते मिळून या दोन जागा कोणी लढवायच्या याबाबत चर्चा करत आहेत. या निवडणुकी संदर्भात मंगळवारी मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
इतर वेळी महाराष्ट्राची परंपरा दिसली नाही : यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर तिथे जर पोट निवडणूक लागली असेल तर तिथली निवडणूक लढवायची नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण, पंढरपूर असेल देगलूर असेल किंवा अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही. तिथेही निवडणूक झाली. अंधेरीत भाजपने निवडणूक लढवली नसली तरी नांदेड आणि पंढरपूरमध्ये दिवंगत आमदारांच्या घरातल्यांना उमेदवारी दिली तरी भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला होता. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होती. ती मुंबईत होती आणि भाजपला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती.
निवडणूक होणारच काही अपक्ष लढतील : याच पोटनिवडणुकी संदर्भात सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि अजित पवार मातोश्रीवर आले होते. या पोटनिवडणुकीत काय करायचे याबाबत चर्चा झाली. आज उद्या पुन्हा चर्चा करून निर्णय घेऊ. निवडणूक लढली तर जी चिंचवडची जागा आहे. ती शिवसेनेने लढवावी असे सगळ्यांचे मत आहे. पुण्यातील कासबाच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस निर्णय घेतील. निवडणूक कशाप्रकारे टाळता येईल याबाबत सुद्धा चर्चा केली. मृत आमदारांच्या घरातील सदस्यांबाबत देखील चर्चा केली. उद्धव ठाकरे स्वतः या चर्चेत होते. इतर प्रमुख जे आहेत ते निर्णय घेतील निवडणूक लढवावी असा साधारण सुर आहे. जरी आम्ही निवडणुकीतून दूर राहिलो तरी ही निवडणूक होणार आहे. काही अपक्ष ही निवडणूक लढवतील. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.