मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रज्ञासिंह यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मकोका कायद्यांतर्गत शिक्षा भोगली होती. याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळतेच कशी, असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे.
महाजन म्हणाले, प्रज्ञासिंह यांच्यावरील मकोका कायद्याअंतर्गत झालेली कारवाई न्यायालयाने बरखास्त केली असली तरी अन्य दहशतवादविरोधी कायद्यांखाली त्यांच्यावर कारवाई चालूच आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी काँग्रेसला चिंता नसल्याचा निराधार व खोटा आरोप भाजपने केला होता. त्याविषयी बोलताना महाजन म्हणाले, काँग्रेसवर आरोप करणाऱ्या भाजपने प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन स्वतः मात्र राष्ट्रीय सुरक्षेची हेळसांड केली आहे. प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतः कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हेच भाजपने सिद्ध केल्याचे महाजन म्हणाले.
काय आहे मालेगाव स्फोट प्रकरण -
मालेगावातील भिकू चौकालगत २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ७ लोकांचा मृत्यू तर ९२ लोक जखमी झाले होते. याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २३ ऑक्टोबर २००८ रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह राकेश धावडे, अजय उर्फ राजा राहिरकर आणि जगदीश म्हात्रे यांना आरोपी म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक कोर्टात हजर केले होते. प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय आणि अजय राहिरकर यांच्यावरील मकोका हटवला होता.