मुंबई- जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट दिला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेला आहे.
किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा
13 जून म्हणजे रविवारी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याचा अंदाच पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट
चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस (Rain) पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.