मुंबई - मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने १५ फेब्रुवारीपासून बच्चे कंपनीची आवडती भायखळा येथील राणीबाग म्हणजेच, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सुरू करण्यात आले होते. मुंबईत आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने राणीबाग पुन्हा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हेही वाचा - पोलिसांच्या भोंगळ कारभारावर मुंबईतील उच्च न्यायालयाचे ताशेरे
११ महिने बंद होती राणीबाग
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने २३ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून राणीबाग बंद करण्यात आली. १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तब्बल ११ महिने राणीबाग बंद होती. १५ फेब्रुवारीपासून हे उद्यान पुन्हा सुरू झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. लॉकडाऊन आधी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १२ हजारांपर्यंत जायची. मात्र, ही संख्याही अडीच ते तीन हजारांवर आली होती. पर्यटकांची संख्या १ लाख ८० हजारांवरून कमी होऊन १ लाखापर्यंत आली, तर महसुलातही घट होऊन १५ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत या महिनाभराच्या कालावधीत केवळ ४१ लाखांचा महसूल जमा झाला.
राणीबाग बंद, नूतनीकरणाचे काम सुरू
मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने कठोर निर्बंध लादत मनोरंजन, मैदानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, पुढील आदेश मिळेपर्यंत हे उद्यान बंद राहणार आहे. मात्र, उद्यानातील नुतनीकरणाचे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. कर्मचारीही नियमितपणे कामावर येत राहणार, त्यामुळे कोणतेही काम थांबणार नाही. नुतनीकरणादरम्यान विविध पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे, त्यामुळे हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आणखी जोमाने भरारी घेऊन पर्यटकांसाठी नेहमीप्रमाणेच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणार, अशी माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.
महिनाभरासाठी राणीबाग बंद
लोकांची सुरक्षितता महत्वाची आहे. जमावबंदी असल्यामुळे जर लोकांना प्रवेश दिला तर उद्यानात प्रवेश केल्यावर पर्यटक प्राण्यांना पाहण्यासाठी गर्दी करतील. त्यावेळी दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच लोकांना समजावून सांगणेही शक्य होणार नाही. त्यामुळे, हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हेही वाचा - मुलुंडमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल चालकावर कारवाई