मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP leader Union Minister Narayan Rane) यांच्या मुंबईतील अधिश बंगल्यातील काही भाग हा अनधिकृत असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) बजावली होती. त्याविरोधात राणे यांनी दावा ठोकत कोणतेही काम अनधिकृत नसल्य़ाचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर आता राणे यांना स्वतःच हे बांधकाम पाडावे लागत आहे. अन्यथा महापालिकेने या बांधकामवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. राणे यांच्याप्रमाणेच अलिकडे काही राजकिय नेत्यांना अनधिकृत बांधकामाच्या नोटीसा (Encroachment Notice ) बजावण्यात आल्या आहेत. याबाबत जाणून घेऊया
परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई : अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे साई रिसॉर्ट आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतलेले होते. पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केलेला. परंतु अनिल परब यांनी हात झटकत हे रिसॉर्ट आपले नसल्याचे सांगितले होते. संबंधित विभागाने या रिसॉर्टची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते अनधिकृत ठरवत चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आल्याचे जाहीर केले . पाडकामाचे टेंडर बांधकाम विभागाकडून काढण्यात आले असून यामध्ये इमारतीची भिंत, कंपाऊंड वॉल, पोचरस्ता, एनएक्सचे बांधकाम पाडायचे आहे. शिवाय जागेचेही सपाटीकरण करायचे आहे. याच कामाची माहिती या जाहिरातीमधून देण्यात आलेली आहे. कामाची अंदाजित रक्कम ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार हे निश्चित झाले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनीही स्वतःच पाडले बांधकाम : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली येथे समुद्रकिनारी अनधिकृत बंगला असल्याची तक्रारही सोमय्या यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्याचे बांधकाम वादात सापडले होते. अखेर हे बांधकाम नार्वेकर यांनी स्वतः पाडून टाकले
कॉंग्रेसच्या नेत्याच्य़ा घरावर कारवाई : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहराच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामाला राजकीय वरदहस्त होता. पालिका इमारतीसमोर राहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या पद्माताई भडांगे यांच्या घराचे अतिक्रमित बांधकाम होते. मुख्याधिकारीपदी नव्याने रुजू झालेले नंदू परळकर यांनी अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू करीत या नेत्यांच्या घरावर बुल़डोझर चालवला. या नेत्या स्थानिक आमदार यांच्या गोटातील समजल्या जात असून, त्यांचे यजमान गोकुल भडांगे हे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आहे.
राणा यांनाही नोटीस : खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या पथकाने 4 मे रोजी रवी राणा यांच्या खारमधील घराची पाहणी केली होती.
कंगना राणावतवरही कारवाई : वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या पाली हिल येथील कार्यालयात अवैध बांधकाम असल्याचा आरोप महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. यासंदर्भात चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश ही पालिकेने दिले होते. मात्र तीने दिलेला खुलासा अमान्य करून पालिकेने तिच्या कार्यालयावर हातोडा चालवला. मात्र ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
आठ वर्षांपूर्वीही नोटीसा: मुंबईतील वरळी येथील सुखदा आणि शुभदा या उच्चाभ्रू सोसायटीतील अनेक राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकामे केल्याचा पालिकेचा दावा आहे. या सोसायटीत अनेक राजकीय नेत्यांनी अनधिकृतरीत्या ऑफिसे थाटली आहेत. गाळ्यांमध्येही वाढीव बांधकाम करून आपली दुकानेही थाटली आहेत. फ्लॅटमध्ये अनेक बदल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-सेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या सोसायटीत घरे घेतली आहेत. राजकीय नेत्यांनी वाढवलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना सातत्याने सतत नोटिसा दिल्या होत्या.
गाळ्यांवर हातोडा पडणारच होता: नोटिसा बजावल्या तरीदेखील त्यांनी पालिकेने सांगितल्याप्रमाणे बदल केले नाहीत किंवा बांधकाम हटविले नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या घरांवर आणि गाळ्यांवर हातोडा पडणारच होता. त्यामुळेच, मुंबई महापालिकेने स्व:तच ही बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला. रणजीत देशमुख, अनिल देशमुख, पतंगराव कदम, अजित पवार, माणिकराव ठाकरे, अण्णा डांगे, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अनधिकृतरीत्या वाढीव बांधकाम केल्याचे पालिकेला आढळून आले होते.
पतंगराव कदमांची जीम होती अनधिकृत : दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांची तर संपूर्ण व्यायामशाळाच अनधिकृत होती. पतंगराव कदम यांनी 'शुभदा' सोसायटीत तीन गाळे घेतले आहेत परंतु ते एकत्र करून या ठिकाणी इसलॅण्ड नावाने जिम्नॅशियमच थाटले आहे. या इमारतीत जिम्नॅशियम उभारले तेदेखील तीन गाळे एकत्र करून. हे अनधिकृत असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने कदम यांना नोटीस बजावली होती.