मुंबई : आमदार रवी राणा यांनी आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू ( Former Minister Bachu Kadu ) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची केंद्रीय तपास यंत्रणांनी दखल घ्यावी. एका जबाबदार आमदाराने दुसऱ्या आमदारावर केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय तपास यंत्रणांनी आता तरी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा या तपास यंत्रणा पक्षपाती आहेत. हे सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress chief spokesperson Atul Londhe ) यांनी दिली आहे.
बच्चू कडूंवर पैसे घेतल्याचा आरोप : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर सत्तांतरासाठी पैसे घेतल्याचा जाहीर आरोप केला आहे. वास्तविक आमदार देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान बच्चू कडू यांनीही त्यांना आव्हान दिले असले तरी या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.
काँग्रेसने धारेवर धरले: आमदार बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून रवी राना यांनी केलेले वक्तव्य गंभीर असून या वक्तव्याची आता केंद्रीय तपास यंत्रणांनी दखल घेतली पाहिजे. इडी सीबीआय आणि आयकर विभागाने या वक्तव्याचा आधार घेत शहानिशा करावी. सत्तांतरासाठी पैसे दिले गेल्याचा थेट आरोप एका जबाबदार आमदारांनी केला आहे त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे अन्यथा तपास यंत्रणांवरच आता पक्षपातीपणाचा आरोप होऊ शकतो असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
कडूंनी लबाडांच्या नादी लागू नये : बच्चू कडू यांनी लबाडांच्या नादी न लागता त्यांची महाराष्ट्रात असलेली सकारात्मक प्रतिमा आणि विश्वास पुन्हा ते जनतेत निर्माण करून वाढवू शकतात. त्यांनी वेळीच शिंदे-फडणवीस सरकारला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. बच्चू कडू यांना समाजकारणात मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राची जनता त्यांना डोक्यावर घेईल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी व्यक्त केली आहे.