मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाच्या मागे दोन दाम्पत्य लागली आहेत. शिवसेनेच्या मागे राणा दांपत्य तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे सदावर्ते दाम्पत्य लागले असून गेल्या काही दिवसापासून या दाम्पत्या कडून दोन्ही पक्षांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. या दाम्पत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ केलेली पाहायला मिळाली. सदावर्ते दांपत्याच्या कडून थेट शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर वेळोवेळी टार्गेट करण्यात आले. तसेच शिवसेनेवर राणा दाम्पत्याने देखील अशाच प्रकारे गंभीर आरोप केले आहेत.
सदावर्ते दाम्पत्य: वकिली पेशा असलेल्या सदावर्ते दाम्पत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात तक्रारी केल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयाची भ्रष्टाचारा बाबतची तक्रार वकील जयश्री पाटील सदावर्ते यांनीच केली होती. त्यांच्या तक्रारीनंतरच देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली. तर एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ आणि एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा कायदेशीर लढा गुणरत्न सदावर्ते यांनी लढला. एसटी कर्मचारी सहा महिने आंदोलन करत होते. या आंदोलनात कोर्टामध्ये आणि कोर्टाच्या बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर सदावर्ते दाम्पत्य एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना पाहायला मिळाले.एसटी कर्मचाऱ्यांचे होणाऱ्या हाल उपेक्षाला सर्वतोपरी शरद पवार जबाबदार असल्याचा उल्लेख वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या समोर सदावर्ते दांपत्याने केला.
जिवाला धोका असल्याचा आरोप: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात आपण सातत्याने बोलत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे हे दांपत्य सातत्याने बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आपण सातत्याने बोलत असल्याकारणाने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शरद पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात आरोपी : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनाला ही सदावर्ते दांपत्याची फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा विकास आघाडीच्या नेत्यांनी केला. या आंदोलनाबाबत गुणरत्न सदावर्ते यांना अटकही झाली. याबाबतचा कायदेशीर लढा आता न्यायालयात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राजकीय भूमिका: यासोबतच आंदोलनाच्या प्रकरणात पती गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर हे दांपत्य राज्य सरकार तसेच शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक होणार नाही असे वाटत असताना या दाम्पत्याने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून एसटी महामंडळ सहकारी बँकेची निवडणूक लढवण्याची तयारी सदावर्ते यांनी दर्शवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या बँकेवर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी तयार असल्याचे सांगच सदावर्ते दाम्पत्यांनी थेट आव्हान दिले आहे.
राणा दाम्पत्य : राज्यामध्ये महा विकास आघाडी सरकार आल्यापासूनच आमदार रवी राणा आणि खासदार असलेल्या नवनीत राणा हे राणा दाम्पत्य महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहे. खास करून या दाम्पत्याच्या टारगेटवर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहिले आहेत. या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने राज्यातले राजकारण तापले. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मातोश्री बाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले. राणा दांपत्याच्या अमरावती आणि मुंबईमधील घरावर शिवसैनिकांनी घेराव घातला. राणा दाम्पत्याच्या या भूमिकेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. नंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांनी या दाम्पत्यांना अटकही केली.
सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करुन आम्हाला सूडबुद्धीने त्रास दिल्याचा आरोप राणा दाम्पत्याने जामीन मिळाल्यानंतर केला. तसेच अटकेत असताना मुंबई पोलिसांनी आपल्याशी गैरव्यवहार केला. आपल्याला साधे पाणी देखील प्यायला दिले नाही. तसेच झोपण्यासाठी सतरंजी दिली नाही. पोलिसांनी हे केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे केल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता.
मुख्यमंत्र्यांची केंद्रात तक्रार : खासदार नवनीत राणा यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार यांची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठले. महाराष्ट्रात आणि मुंबईत कशा प्रकारे पोलिसांचा गैरवापर सुरू आहे. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्या अधिकारांचा देखील शिवसेनेकडून गैरवापर केला जातो. त्यात गैर वापराच्या आधारावर मुंबईमधील आमच्या खार येथील घराला नोटीस पाठवली. एका महिला खासदारा बरोबर पोलिसांकडून अत्यंत हीन वागणूक देण्यात आली. मुख्यमंत्री आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत आहेत अशा गंभीर तक्रारी राणा दाम्पत्याने दिल्लीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
दाम्पत्याना विरोधकांची फूस : महा विकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी जंगजंग पछाडले. मात्र हा विकास आघाडी सरकार पाडण्यात विरोधकांना यश आले नाही. त्यामुळे आता मिळेल त्या मार्गाने राज्य सरकारला तसा त्रास देता येईल यासाठी विरोधक प्रयत्न करत आहे. त्यातूनच या दाम्पत्य जोडीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षावर आरोपांचा भडीमार केला आहे. खास करून, देवेंद्र फडणीस यांची त्यांना फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकार वर केलेल्या आरोपांमुळे या दोन्ही पक्षांना भविष्यात भारतीय जनता पक्षाकडून छुप्या किंवा खुल्या मार्गाने राजकीय मदत देखील होण्याची शक्यता असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : MP Navneet Rana :...म्हणून अपक्ष खासदार नवनीत राणा मागतात भाजपाकडे दाद !