मुंबई - एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन दीपक साठे हे मुंबईचे आणि मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी बलिदान देत अन्य प्रवाशांचा जीव वाचवला, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
वंदे भारत अभियान अंतर्गत दुबईहून भारतीय नागरिकांना घेऊन परतणारे एअर इंडियाचे विमान केरळ मधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर घसरले. या अपघातात 19 जण मृत्युमुखी पडले. या अपघातात वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांनी कौशल्य, धाडस दाखवून स्वतःचे बलिदान देऊन विमानातील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. विमान दुर्घटनेत 170 लोक वाचले असून 19 जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये स्वतः कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. स्वतःचे बलिदान देत अन्य प्रवाश्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारे एअर इंडियाचे वैमानिक मुंबईचे आणि मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी काढले.
कोझिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली पाहिजे. शासनाने जखमींना आर्थिक मदत दिली पाहिजे. या अपघाताची उच्च स्तरीय चौकशी होणार आहे. केरळमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने हा विमान अपघात झाला. या पावसात एनडीआरएफच्या पथकांनी कौशल्याने मदतकार्य करून प्रवाशांना वाचवल्याने त्यांचेही कौतुक आठवले यांनी केले.