मुंबई - महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावावे आणि त्याखाली जन्म आणि मृत्यूची नोंद करावी, अशी मागणी राम नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. शिवसेना शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करते. त्यावरूनच राम नाईक यांनी त्यांना कैचीत पकडले असल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराप्रकरणी आगोदर विधिमंडळात प्रस्ताव सादर करावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
यावेळी राम नाईक म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना संसदीय कामाचा अनुभव नाही. मी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत त्यांनी केलेल्या मागणीचे स्वागत करतो. मी राज्यपाल होतो. त्या अनुभवानुसार मी या भेटीत त्यांना कायदेशीर बाबींची माहिती दिली. सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर केल्यानंतर ते विधेयक राज्यपालांना मान्यतेसाठी पाठवावे लागते'
हेही वाचा - कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
असाच एक प्रसंग आपल्या कार्यकाळात आपण हाताळला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना मार्गदर्शन करत राहण्याची विनंती केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारावर हिवाळी अधिवेशनात विधेयक प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.