मुंबई - इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल अलिबाग पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपाने राज्यातील ठिकठिकाणी आक्रमक होत आंदोलन केले. गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यात आज भाजपा नेते राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेत मारहाण करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. त्यासंदर्भात कदम यांनी राज्यपालांना पत्र देखील दिले आहे.
सरकारची ही दडपशाही आहे, कोणालाही ही पोलिसांच्या माध्यमातून अडकवत आहेत.राज्यात पत्रकाराला मारहाण करणं म्हणजे लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा अपमान आहे. राज्यात जे चालले आहे ते चुकीचे आहे. अर्णब यांना नऊ पोलिसांनी काल मारहाण केली यांचावर तत्काळ करवाई व्हावी, यासाठी आज आम्ही राज्यपालांना भेटलो व कारवाईची मागणी केली, अशी माहिती राम कदम यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली, की अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजपा नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करत आहेत? गोस्वामी काय भाजपाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल परब यांनी उपस्थित केला आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या एका जुन्या प्रकरणात रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना बुधवारी सकाळी अटक केली. सायंकाळी उशिरा गोस्वामी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील न्यायालयात हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. सुमारे सहा तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर रिमांड ऑर्डर देण्यात आली. मात्र, गोस्वामींच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे.