मुंबई - डोंगरी येथील केसरबाई ही म्हाडाची सेस इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अशा ४९९ इमारती धोकादायक परिस्थितीत उभ्या आहेत. यामध्ये मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारतींमधील नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशा इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सेल बनवावा तसेच धोरण बनवावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.
याबाबात बोलताना राखी जाधव म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या काही नियमावली आहेत. त्याच्या अखत्यारीत काही मालमत्ता आहेत. त्या धोकादायक असल्यास त्याठिकाणाहून लोकांना बाहेर काढून पुनर्विकासाची भूमिका पालिका हाताळत असते. विशेष करून म्हाडाच्या अखत्यारीत सेसच्या इमारती आहेत. त्या दुरुस्त होणे अपेक्षित असते. अशा इमारतींचे प्राधिकरण वेगळे असल्याने दुर्लक्ष होत असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले.
डोंगरीची केसरबाई इमारत दुर्घटना घडली. त्याच्या बाजूला असलेल्या अनेक इमारतींबाबत म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून कारवाई होणे अपेक्षित होते, असे आयुक्तांनी सांगितले आहे. अशा इमारतींमधील नागरिक उपकर भरत आहेत. पगडीच्या आणि मालकी हक्क असलेल्या इमारतींमध्ये वाद असतात. धोकादायक इमारतींमधील नागरिक माहुलला प्रदूषण असल्याने व सुविधा नसल्याने जाण्यास तयार नसतात. नागरिक धोकादायक इमारतींमध्ये आपला जीव मुठीत घेऊन राहतात. पुढे अशाच इमारतींमध्ये दुर्घटना घडून त्यांचा जीव जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी पालिकेने सेल सुरु करावा तसेच एखादे धोरण आखले पाहिजे, अशी मागणी राखी जाधव यांनी केली आहे.
४९९ इमारती धोकादायक -
मुंबईत ४९९ इमारती धोकादायक परिस्थितीत उभ्या आहेत. यामध्ये पालिकेच्या ७५, सरकारी ८, खासगी ४१६ इमारतींचा समावेश आहे. यापैकी ६५ इमारतींचे वीज व पाणी जोडणी कापण्यात आली आहे. तसेच या इमारतींमध्ये सर्वात जास्त इमारती या घाटकोपर 'एन' विभागात ६४, अंधेरी पश्चिम येथील 'के/पश्चिम' विभागात ५१ व भांडुप मुलुंड येथील 'टी' विभागात ४७ इमारती आहेत. १७४ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तर ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्यासाठी पाठवण्यात आली आहेत.