मुंबई - माझ्या पराभवाची हळहळ ही देशातील शेतकऱ्यांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे. मी चळवळीतून आलो आहे, त्यामुळे पराजय झाला म्हणून खचून जाणार नाही आणि आम्ही लढाई सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
मुंबईत आज संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सर्व घटक पक्षाची चिंतन बैठक विधानपरिषदेचे नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली, त्यानंतर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही राज्यात प्रामाणिकपणे लढलो, प्रयत्नही चांगले केले, परंतु, लोकशाहीत जय आणि पराजय चालत असतो. त्यामुळे खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा आम्ही उभे राहू. राज्यात दुष्काळाने जनता होरपळून जात आहे. त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता संघर्ष तीव्र करायचा आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आमच्या आघाडीत जे सोबत होते, त्यांच्या शिवाय इतर काही लोकांना एकत्र आणता येईल काय, आणि त्यांची एक मोठ बांधता येईल काय? यावरही आज चांगल्या चर्चेला सुरुवात झाली.
राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर काम करायचे आहे. यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत. त्यासाठी दुष्काळाचा दौराही लवकरच काढला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसंदर्भात देशभरातच संशयाचे वातावरण आहे. आता अनेक गोष्टी या सोशल मीडियावर येत आहेत. एकाच मतदारसंघात सात उमेदवारांना सारखी मते कशी पडतात हेही समोर आले आहे. दुसरीकडे माझ्या मतदारसंघात मी मतमोजणीच्या ठिकाणी जॅमर लावण्याची मागणी केली होती, परंतु आयोगाने जॅमर लावला नाही. मात्र, मतमोजणीच्या आदल्या दिवशी याच परिसरात शिराळा येथून 100 किमी दूर असूनही तेथील वायफायचे सिग्नल दिसत होते. याच प्रमाणे इस्लामपूर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथीलही सिग्नल दिसत होते, हे सर्व संशयास्पदरित्या सुरू होते. याविषयी मी तक्रार केल्यानंतर ते बंद झाले. याची मी आयोगाकडे तक्रार केली असून त्यासाठीचा कोणताही खुलासा मला अजून आलेला नाही. तो आल्यानंतर त्यावर काय करायचे याविषयी मी पुढील दिशा ठरविणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.