मुंबई - कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणाची ईडीने चौकशी करावी अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी ईडी कार्यलयात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे. शुक्रवारी मुंबईतील ईडी कार्यालयात राजू शेट्टी हे सकाळी हजर झाले.
काय आहे प्रकरण -
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता. राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपानुसार कडकनाथ संबंधी कंपनीचा मालक हा सदाभाऊ खोत यांचा नातेवाईक आहे.
हेही वाचा - 'कडकनाथ' घोटाळा प्रकरण : सांगलीत स्वाभिमानी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा
गेल्या बऱ्याच दिवसांपासून या प्रकरणावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत . पण या दोघांमधील राजकीय वाद इथपर्यंत न थांबता सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार करण्यास राजू शेट्टी हे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
हेही वाचा - ''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'