मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मोदी विरोधात ज्याप्रमाणे पुरावे देऊन मुद्दे मांडत आहेत. त्याचा फटका राज्यात सेना-भाजपला बसणार आहे. तर फायदा मात्र वंचित बहुजन आघाडीला होणार, असल्याचा दावा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख व वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी आज (सोमवारी) मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात राज ठाकरे यांच्या सभांमुळे नमो भक्त अस्वस्थ, विचलित झाले आहेत. त्यामुळे ते काहीही आरोप करत सुटले असले तरी राज ठाकरे यांचे म्हणणे खोडत नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.
डॉ. अनिल कुमार यांच्या कार्याचे वलय हे दक्षिण मुंबई या मतदारसंघात आहे. त्यांनी हजारो गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या आहेत. जनतेला सेना-भाजप आणि इतर पक्षही नको आहेत. त्यांना डॉ. अनिल कुमार हा एक प्रभावी पर्याय आहे. आज भाजप-सेनेची नाही तर राज्यात वंचित बहुजन आघाडीची लाट आहे. लोकांना नवीन पर्याय हवा होता, तो आम्ही आघाडीच्या माध्यमातून दिला आहे. अनेक लोक पक्षभेद विसरून बाळासाहेब आंबेडकर यांचा प्रचार करत आहेत. मराठवाड्यात आमच्या आघाडीची चांगली हवा झाली. त्यामुळे आम्हाला तिथे ५ आणि राज्यात १०हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
संविधानाला हात लावू पाहणारे देशातून हद्दपार झाले पाहिजे, अशी आमची भूमिका होती. काँग्रेसही संविधान बदलणाऱ्या शक्तीला मदत करत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, दक्षिण मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल कुमार यांनी आपल्याला आरोग्य सेवेसाठी वाहून घ्यायचे आहे. देशातील आणि मुंबईतील जनतेला त्यांच्या आरोग्याचे अधिकार मिळवून द्यायचे असल्याने मी लोकसभेसाठी निवडणुक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.