नवी मुंबई - नवी मुंबईतील पश्चिम महाराष्ट्र महोत्सवात राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी वर्गासह भेट दिली. यावेळी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी भाषणाचा तोफखाना बाहेर काढू, असे ते म्हणाले.
सानपाडा येथील सेक्टर ९ मधील झाशीची राणी मैदानात भरलेल्या पश्चिम महाराष्ट्र महोत्सवाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाधिकारी वर्गासह सदिच्छा भेट दिली. मात्र, मंचावर त्यांनी आपल्या दोन मिनिटांच्या भाषणात कोणत्याही प्रकारची टिप्पणी किंवा राजकीय वक्तव्य करणं टाळलं. सद्यस्थितीत मी कोणत्याही प्रकारचे भाषण व वक्तव्ये करणार नाही. मात्र, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका येतील, तेव्हा भाषणातून तोफखाना काढून सर्व गोष्टीवर सविस्तर बोलु, असे ते म्हणाले.
पक्षाच्या बदललेल्या भूमिकेबद्दल सर्व स्तरात उत्सुकता आहे. मात्र, त्याबद्दलही राज ठाकरे काहीही बोलले नाही. महाराष्ट्र हा विविध खाद्य संस्कृतीने समृद्ध आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ असणारा महोत्सव भरवावा, असे त्यांनी आयोजकांना सुचवले.