मुंबई: परदेशात कलाकारांना योग्य सन्मान मिळतो मात्र तसा सन्मान भारतात मिळत नाही. आपल्याकडे प्रतिमा जपल्या जातात प्रतिभा जपल्या जात नाहीत. आज दामले युरोपात असते तर त्यांच्या विक्रमी प्रयोगाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान आले असते. मात्र आपल्याकडे कलाकारांकडे दुर्लक्ष केले जाते. आमच्या सारख्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार करावा लागतो अशी खंत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग षण्मुखानंद हॉल किंग सर्कल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कलाकारांकडे दुर्लक्ष: या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, मी रोम मध्ये गेलो होतो तेव्हा तेथील कलाकाराचे नाव विमानतळाला दिले गेले हे ऐकून अंगावर शहारा आला. मात्र आपल्याकडचे कलाकार चौकात मिळतात. त्यांची नावे चौकाला किंवा एखाद्या छोट्या रस्त्याला दिली जातात. एखाद्या मोठ्या रस्त्याला आणि पुलाला नाव द्यायची झाल्यास काही मोजक्या लोकांची नावे दिली जातात. कलाकारांची नावे दिली जात नाहीत.
हा विक्रम कमाल आहे: एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे १२५०० प्रयोग झाले आहेत. एक नाटक ३ तास चालते. त्यानुसार ३७ हजार ५०० तास म्हणजेच १५६२ दिवस प्रशांत दामले रंगभूमीवर आहेत. हा विक्रम कमाल आहे. मराठी माणूस नाटक वेडा आहे. सामान्य माणूस या नाटकात गुंतून जातो. यामुळे वाईट गोष्टीपासून दूर राहतो. प्रशांत दामले यांनी बेस्टची नोकरी सोडून रंग भूमीचे तिकीट काढले म्हणून ते वाचले असे ठाकरे म्हणाले.
२५ हजार व्या कार्यक्रमाला आम्हालाच बोलवा: मराठी नाट्य सृष्टीत विष्णुदास भावे यांच्यासोबत प्रशांत दामले यांचेही नावे घेतले गेले पाहिजे. दामले यांच्या नाटकाचे १२५०० प्रयोग झाले आहेत. आजच्या विक्रमी प्रयोगाच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. या नाटकाचे २५ हजार प्रयोग करावेत आणि त्या विक्रमी प्रयोगाला आम्हालाच बोलवावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ५१ नाट्यगृहांचे दुरुस्तीचे प्लॅन दामले यांनी दिले असून त्यानुसार लवकर कार्यवाही केली जाईल असे फडणवीस म्हणाले.
इंडस्ट्रीचा दर्जा द्या ही मागणी पूर्ण झालेली नाही: यावेळी बोलताना प्रशांत दामले म्हणाले, १९८३ मध्ये मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सोबत कामाला सुरुवात केली. सुयोग आणि बेस्टचा आधार मिळाला आणि ३ वर्षे काम केले. त्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांचे महत्वाचे योगदान आहे. १०० टक्के कोणीही बरोबर नसतं. आपण एकमेकांच्या चुका झाकतो तेव्हा ते नाटक चांगलं होतं. नाटक चांगले होण्यासाठी टीमवर्क महत्वाची असते. तसेच जिद्द लागते. कलाकाराने इमानदारीने काम करायला हवे. लोक सिरियल मधून इकडे येतात. नाटकासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. स्वतःवर तसेच दिग्दर्शकावर विश्वास हवा. चांगले नाटक झाले की प्रेक्षकही आपल्याला डोक्यावर घेतात. मी प्रदीप पटवर्धन सारख्या मित्र आणि मार्गदर्शकाला मिस करतोय. माझं कोणासोबत भांडण होत नाही. समाज आणि शासनाच्या दृष्टीने आपण लहान आहोत. आपण पंच पक्वान्न मधील मीठ आहोत. अद्यापही नाट्य व्यवसाय अधिकृत झालेला नाही. त्याला इंडस्ट्रीचा दर्जा द्या ही मागणी पूर्ण झालेली नाही. लवकरच नवीन इनिंग सुरू करतो आहे असे देखील दामले म्हणाले.