मुंबई - या राज्याला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. कारण, सत्तेतील आमदार काहीच नाही करू शकत. पण, विरोधातील आमदार तुमच्यावतीने सर्व जाब सत्ताधाऱ्यांनी विचारू शकतो. त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या, असे आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केले आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रचार करण्याची ही भारताच्या राजकारणातील पहिलीच वेळ आहे.
आज (गुरूवार) मुंबईतील वांद्रे येथे राज ठाकरे प्रचार सभेत बोलत होते. त्यांनी यावेळी ठाकरे शैलीत सरकारचा चांगला समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. ठाण्यात काल (बुधवार) रात्री एका तरूणीचा खड्डे चुकविण्याच्या नादात ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. युती सरकारने मोठ्या रोजगार निर्मितीची घोषणा केली होती. पण, सत्तेत आल्यानंतर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या तर बेरोजगार तरूण आजही बेरोजगारच आहेत.
हेही वाचा - मोदींनी मुंबई दहशतवाद मुक्त केली; योगी आदित्यनाथ यांचा दावा
राज्यात साडेसहा हजार कोटींचा पीएमसी घोटाळा झाला. या बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता सरकार पीएमसीमधील खातेदारांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादते. सत्तेत आल्यानंतर सत्ताधारी आमदार काहीच काम करत नाहीत. त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे केवळ अर्ध्या तासाच्या पावसानंतर पुणे पाण्यात गेले. सत्ताधाऱ्यांना तुमच्या वतीने जाब विचारण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.
हेही वाचा - 17 दिवसांपासून सरकार झोपलेले का? पीएमसीवरुन चरणसिंगांचा हल्लाबोल