मुंबई - बँकेच्या ठेवी बुडवणारे मजेत आहेत. मागच्या ५ वर्षात राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. राज्यात सभा घेणारे अमित शाह याबद्दल बोलायला तयार नाहीत. पूल पडला मुंबईत. पण सरकारला याचं देणंघेणं नाहीत. ५ वर्षात काय केलं, याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. तुमच्या मनातली आग, राग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवत आहे, मला साथ द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडुपमधल्या सभेत केलं.
हे वाचलं का? - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची भांडुपमध्ये सभा झाली. यावेळी ते म्हणाले, मतदानाचा दिवस येईपर्यंत हुजरे मुजरे घालतात. पुढचे ५ वर्ष मात्र तुम्ही मेलाय की जिवंत याचा विचार ते करत नाहीत. जाहीरनामे, वचननामे काढतात. तुम्हीही त्याबद्दल त्यांना विचारत नाहीत. चॅनेलवालेही सत्ताधाऱ्यांना काहीही विचारत नाहीत. जनतेचा हाच विसराळूपणा त्यांच्या पथ्यावर पडतोय.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्ड्यांचा प्रश्न सोडवणार, महत्त्वाच्या ठिकाणांपासून विमानतळापर्यंत शटल सेवा सुरू करणार, अशी आश्वासनं सरकारनं दिली, त्याचं काय झालं, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. आधीच्या सरकारकडे साडे चार लाख कर्ज होतं. आता ते अडीच लाख कोटींपर्यंत पोहोचलंय, असा आरोप त्यांनी केला.
हे वाचलं का? - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या - राज ठाकरे
आंदोलनंच नाही, रिझल्ट दिले -
मनसेच्या दणक्यानं टेलिकॉम कंपन्यांनी मराठी भाषा सुरू केली. ७८ टोलनाके बंद झाले. मनसेनं केवळ आंदोलनंच नाही केली तर रिझल्ट दिला. एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही, असं ते म्हणाले.
नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काय संकट येणार हे सांगितलं होतं. उद्योगधंदे रसातळाला जात आहेत. एका वेळी १० हजार माणसं काढली जातायत. नोकरीची हमी नाही. ही वेळ कोणी आणली, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्याकडे पैसा आहे, त्या जोरावरच निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आता तर विरोधी पक्षही नाही. विरोधी पक्षनेताच भाजपात गेलाय. आरेतली झाडं कापताना त्यांनी तुम्हाला विचारलं का, कुलाब्याला कार शेड करता आलं असतं, असंही ते म्हणाले. रात्रीतून शुक्रवारी झाडं कापली. कारण शनिवार-रविवार न्यायालय बंद असतं. अशाप्रकारच्या जुलमी कारभाराचा विरोध करण्यासाठी विधानसभेत जायचं आहे. सरकारला वठणीवर आणायचं आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.