मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा हिटलरची कॉपी करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्याप्रमाणे हिटलर वागत होता, त्याचप्रमाणे मोदीही त्यांच्याविरोधात कुणी बोललं, की त्याला देशद्रोही ठरवतात, असे राज यांनी म्हटले आहे. ते शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेत बोलत होते.
मोदींनी अच्छे दिन ही संकल्पना कॉपी केली आहे. अच्छे दिनची संकल्पना सर्वात पहिले अमेरिकी राष्ट्रपती रूझवेल्ट यांच्या वडिलांनी मांडली होती. त्यांनी 'हॅप्पी डेज विल कम' असा नारा दिला होता. हाच नारा मोदींनी दिला. मोदींच्या देशात राबलेल्या नीती कशा चुकीच्या आहेत. त्यामुळे जनतेचे किती नुकसान होत आहे. सोबतच मोदी सरकार खोटारडे आहे याद्दलच्या चित्रफीती राज यांनी सभेदरम्यान दाखवल्या.
तीस वर्षानंतर काँग्रेसव्यतिरीक्त एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले असतानादेखील मोदींनी देशाची वाट लावली. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदीं बदलले. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. पाच वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांच्यासारखा थापा मारणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे राज म्हणाले. नोटाबंदीनंतर साडेचार कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली असल्याचे राज म्हणाले.
मनसेने लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.