मुंबई - मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल विभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने (Mumbai rains live updates) केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.
सखल भागात पाणी साचले -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होते. यावर्षी मोठ्या नाल्यांची 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. हा दावा करून काही तासच झाले असताना हा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे. मुंबईत रात्रीपासून पडत आहे. गेल्या 24 तासात 8 जून ते 9 जून सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात मुंबईत शहर विभागात 48.49 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 66.99 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 48.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अद्यापही पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईच्या सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. समुद्राला सकाळी 11.43 वाजता 4.16 मीटरची भरती असल्याने यावेळेत मोठा पाऊस पडल्यास शहरातील सखल भागात पाणी साचून राहणार आहे. याचा फटका रस्ते, रेल्वे वाहतुकीला बसू शकतो तसेच नागरिकांनाही त्याचा त्रास होणार आहे.
१०४ टक्के नालेसफाई -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यंदा नालेसफाई दरम्यान मे अखेरपर्यंत मोठया नाल्यांमधून ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका म्हणजे १२ हजार ९०३ मेट्रिक टन जास्त काढला आहे. यंदा मोठ्या नाल्यातून १०४ टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.