मुंबई - लोकल सेवेची अनियमितता आणि रखडलेले प्रकल्प यामुळे लाखो प्रवाशांना होणाऱ्या प्रचंड त्रासामुळे प्रवाशांनी मंगळवारी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या समस्या याबाबत प्रवासी संघटनांनी रेल्वेला पत्रव्यवहार केला होता. परंतू रेल्वे प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. रेल्वेच्या या कारभारावर नाराज होत प्रवासी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले.
हेही वाचा - दिल्लीत फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती
दूरदृष्टीचा आणि दीर्घकालीन नियोजनाचा अभाव असल्यामुळे तसेच सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करण्याचा शासनकर्त्यांच्या वृत्तीमुळे उपनगरीय रेल्वेने प्रवास करणारी जनता कमालीच्या असुरक्षित आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. रेल्वे प्रवाशांची अवहेलना करते, हे अत्यंत संतापजनक असून प्रवाशांनी धरणे आंदोलन करत आपला संताप केला.
हेही वाचा - पंकजा मुंडेंचे पुन्हा एक ट्विट, सहकाऱ्यांना घातली भावनीक साद, म्हणाल्या...
स्वातंत्र्याच्या 72 वर्षात आपल्या येथील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेचे हे दारुण अपयश आहे. आपण व्यवस्था बदलू शकत नाही. मात्र, त्या व्यवस्थेत काही चांगले बदल निश्चित करू शकतो. याच एका व्यापक विचारातून केवळ रेल्वे प्रवाशांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख सांगितले.
प्रवाशांनी आंदोलनादरम्यान केलेल्या मागण्या -
- मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक सुधारावे
- मध्य रेल्वेवरील युटर मोटर्स कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे उपनगरीय गाड्यांचा खोळंबा होणे नेहमीच बाब आहे
- पश्चिम रेल्वेवर उपनगरीय गाड्यांमध्ये मध्य रेल्वेपेक्षा जास्त असून त्या सुरळीत चालतात मग मध्य रेल्वे कुठे कमी पडते.
- मध्य रेल्वेमध्ये केलेल्या तक्रारीचे उत्तर न देण्याचे कारण काय?
- रेल्वे स्थानकात अधिकृत रेल्वे स्ट्रेचर हमाल हवेत
- दिवा पनवेल वसई त्वरित लोकल सेवा सुरु करावी.
- ज्या स्थानकात गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्या स्थानकात स्पेशल फास्ट लोकल त्वरित करण्यात यावी.
- कल्याण मुंबई पाचवा व सहावा मार्ग, कल्याण-कसारा तिसरा मार्ग चौथा मार्ग, बदलापूर चौथा मार्ग, कर्जत पनवेल दुसरा मार्ग वेळेत पूर्ण व्हावा.
- गर्दीच्या वेळी मुंबई आसनगाव बदलापूर वसई विरार पंधरा डब्यांच्या गाड्या सुरु करावी
या विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी आल्या होत्या. जर या आंदोलनाची प्रशासनाने पुढील काळात दखल घेतली नाही. तर प्रवासी संघटना आणि प्रवासी येत्या दिवसात दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात जाऊन आंदोलन करतील, असेही देशमुख यांनी सांगितले.