मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत 260 ग्रॅम हीरोइन व 22 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी एका नाजरेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
७ परदेशी अमली पदार्थ तस्करांना अटक
याआगोदर ३१ मार्च रोजी जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ५५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नासिर समीरउद्दिन यास अटक करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ ते २१ मार्च २०२१ या तीन महिन्यांच्या काळात ७ परदेशी अमली पदार्थ तस्करांना एनसीबीने अटक केली आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?
एजाज खानची ८ तास चौकशी
अभिनेता एजाज खान यास बॉलीवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेता-अभिनेत्री, ओटीटी प्लॅटफॉर्म मालक व अंडरवर्ल्डशी संबंधित काही व्यक्तींना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. याअगोदर अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कर शादाब बटाटा व शाहरुख खान यांनी त्यांच्या टोळीमध्ये एजाज खान असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर एजाजला जयपूरहून मुंबई विमानतळावर आल्यावर एनसीबीने ताब्यात घेत तब्बल 8 तास चौकशी केली होती. व त्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.
बॉलिवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील व्यक्तींना समन्स
दरम्यान न्यायालयाने एजाजची 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्या चौकशीतून समोर येणाऱ्या नावांची यादी एनसीबी तयार करत असून लवकरच बॉलिवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील काही व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावले जाणार आहे.
हेही वाचा - नाशकात बेड न मिळाल्याने केले आंदोलन, कोरोना रुग्णाचा हकनाक गेला जीव