मुंबई - मुंबईमधील बेस्ट व्यवस्थापकाच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा आरोप असलेल्या खटल्यात हजर राहण्याकरिता विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर न्यायालयात हजर राहिले. न्यायायलयातून बाहेर आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विधिमंडळाचे सार्वभौमत्व दोन्हींचे पालन मी करणार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा प्रभाव बिलकुल पडणार नाही.
राज्यांमधील शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळ सभापती राहुल नार्वेकर चालढकल करतात, असा दावा करणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सुनावणी सुरू आहे. त्या संदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन मी करेल. त्याबद्दल कोणतंही दुमत नाहीच. तसेच संसदीय लोकशाही परंपरा आणि विधिमंडळाचे सार्वभौमत्व याचेदेखील कसोशीने पालन करणार आहे.
घटनेच्या चौकटीमध्ये राहून निर्णय घेणार-आमदारांच्या पात्र अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर चालढकल करतात, असा आरोप होतो. या त्यांच्यावर आरोपांच्या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी खुलासा केला, प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे. ते त्यांच्या पद्धतीने आरोप करतात त्यांना करू द्या. परंतु माझं काम कुठल्याही आरोपांमुळे विचलित होण्याचे नाही. कोणत्याही विरोधकांच्या आरोपामुळे मी प्रभावित होणार नाही. कायद्यानुसार आणि राज्यघटनेच्या नियमानुसार मी त्या पद्धतीने घटनेच्या चौकटीमध्ये राहून त्याबद्दल निर्णय देईल. त्यामुळे अशा कोणत्याही आरोपांचा मी विचार करीत नाही.
संविधानाने स्थापित केलेले कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्याय मंडळ या सर्वांचाच आदर राखलाच पाहिजे. तो आदर मी राखणार आहे. विधिमंडळाचे विधिमंडळातील पिठासीन अधिकारी असेल या सर्वांचाच सन्मान राखणं माझं कर्तव्य आहे-विधानसभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर
मीदेखील अवमान करणार नाही- पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा संविधानाच्या अंतर्गतच राहून काम करणार आहोत. जो व्यक्ती संविधानाच्या नीती-नियमांना मानतो, तो राज्यघटनेद्वारे स्थापित कोणत्याही यंत्रणा किंवा संस्था यांचा अवमान करीत नाही. मीदेखील अवमान करणार नाही. त्याचे कारण संसदीय सार्वभौमतत्व आणि न्यायालयीन आदेश हे आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत.
हेही वाचा-