मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे हा राजीनाम देण्यात आला होता. राहुल गांधींनी तो राजीनामा स्विकारल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने करण्यात येत होता. मुलगा सुजयसाठी नगर लोकसभेची जागा न सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची नाराजी स्पष्टपणे उघड होती. अखेर त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आजही पक्षात आहेत मात्र त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर पक्षश्रेष्टी काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी अशोक चव्हाण यांनी सांगितले. आजच काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तो स्वीकारण्यात आला असून जिल्हा काँग्रेसची संपूर्ण कमेटी बरखास्त केल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
उद्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी संगमनेर येथे प्रचारासाठी येत असताना विरोधी पक्षनेत्यांचा आणि जिल्हाअध्यक्षांचा राजीनामा म्हणजे काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता राजीनामा स्विकारल्यानंतर विखे पाटील नेमकी काय राजकीय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.