मुंबई- चित्रकारांच्या हातात जादू असते असे म्हणतात. मात्र, हातासोबत पायाचाही चित्र काढण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, ही कल्पनाही जिथे दुबळी ठरते तिथे आसामच्या एका अवलियाने हाता, पायाच्या वापरातून चित्र रेखाटण्याची कला जोपासली आहे. जहांगीर कलादालनात आयोजित चित्र प्रदर्शनात त्या चित्रकाराचे 'इन्कारनेशन' चित्र ठेवण्यात आले आहे. चित्रकार राबिन बार असे त्याचे नाव असून त्याची कला पाहायला सध्या मोठी गर्दी होत आहे.
हेही वाचा- 10 वीच्या परीक्षेत सीसीटीव्ही ठेवणार कॉपीबहाद्दरांवर नजर; जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
चित्रकार राबिन बार मुळचे आसामचे आहेत. राबिन हे तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी चित्रे अवघ्या तीन मिनिटात साकारतात. त्यांची ही कला पाहणारा प्रत्येक जण आवाक होतो.
जागतिक कीर्तीचे चित्रकार अशी ओळख असेलेले राबीन यांचे 'इन्कारनेशन' हे चित्र जहांगीर कलादालनात आयोजित प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड राबिन यांना आज इथपर्यत घेवून आली आहे. मुख्य बाब म्हणजे राबिन यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही आहे. राबिन यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. तसेच त्यांची 45 पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत.
राबीन यांच्या तीन मिनिटांत 30 रेखाचित्रे रेखाटण्याच्या विक्रमाची 'नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. या प्रदर्शनात राबीन यांनी वेद आणि पौराणिक कथांवर साकारलेल्या 40 विविध चित्रांचा समावेश आहे. 8 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वाना निशुल्क पाहता येणार आहे.
'मी अभ्यासात हुशार नसल्यामुळे घरचे माझ्यावर खुश नसायचे. यामुळे मी अक्षर आणि अंकांच्या आकारात चित्रकला शोधत राहायचो. मला अभ्यास करायला आणि खेळायला आवडत नसत. लहापणापासून फक्त चित्रकलेवर प्रेम होते. खेळण्याऐवजी माझ्या गावाजवळील नदीकाठी वाळूमध्ये पायाने व हाताने चित्र रेखाटायचो. त्यातून एकाच वेळी पायाने आणि हाताने आपण चित्र काढू शकतो याची जाणीव झाली. तेव्हापासून माझ्या कलेला सुरुवात झाली', असे राबिन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.