मुंबई : मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील 'डीवायएसपी' निलेश अष्टेकर यांनी नोकरी लावून देतो, या बहाण्याने पुण्यातील एका विधवा महिलेला संपर्क केला होता. नंतर तिच्यासोबत विविध प्रकारे चॅटिंग केले आणि एक दिवस तिला व्हिडिओ कॉल करत स्वतः नग्न झाले. त्यांनी अत्यंत असभ्य भाषेमध्ये त्या महिलेसोबत संवाद साधला. तसेच 'तू मला आवडलीच, मात्र तुझी लहान मुलगी देखील मला आवडली', असे त्या व्हाट्सअप कॉलमध्ये म्हटल्याचे देखील वकील चित्रा साळुंखे यांनी आपल्या आरोपांमध्ये नमूद केलेले आहे.
'हे' आहेत आरोप : यासंदर्भात निलेश अष्टेकर यांनी या महिलेला तिच्यासोबत बळजबरीने शरीर संबंधाची मागणी केली. तसेच तिच्या अल्पवयीन मुलीसोबत देखील शरीर संबंधाची मागणी त्यांनी व्हाट्सअप कॉलद्वारे केली. यासोबत त्यांनी इंटरनेटवरील विविध प्रकारच्या 'ब्ल्यू फिल्म' देखील त्या विधवेच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवल्या. पुणे पोलिसांनी प्रकरणाचा पाठपुरावा करत अखेर गुन्हा दाखल केला आहे; मात्र पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला नाही. चित्रा साळुंखे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळवण्यासाठी आम्ही धाव घेत आहोत, असे सांगितले.
तर 'एसीपी' तपास कसा करू शकतो? 'डीवायएसपी' निलेश अष्टेकर यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला गेला; परंतु आपल्यापेक्षा वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्याची त्याच्याच हाताखालच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून याबाबत चौकशी कशी काय होऊ शकते? त्यामुळेच पुण्यातील हा गुन्हा मुंबईमध्ये वर्ग करावा आणि याबाबत उच्च न्यायालयाने स्वतः हस्तक्षेप करावा, अशी मागणी एडव्होकेट चित्रा साळुंखे यांनी केली.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा: पुणे पोलिसांनी खूप नेटाने प्रयत्न केल्यानंतर 'डीवायएसपी' निलेश अष्टेकर विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला; मात्र पीडित महिलेची मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्यासोबत शरीर संबंधाची मागणी केल्यामुळे अष्टेकरांविरुद्ध पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवणे अनिवार्य आहे; परंतु पोलीस हे ऐकत नसल्या कारणाने आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे एडवोकेट चित्रा साळुंखे यांनी सांगितले.