राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सत्ता संघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच, गेल्या ८ महिन्यांपासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. अश्यातच ठाकरे गटाकडून आणखी एक भर पडली ती म्हणजे, उल्हासनगर मधील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर लिखित 'गद्दारांना क्षमा नाही' या सध्याच्या राजकीय घडामोडींवरील वैशिष्ठ्यपूर्ण लेखाच्या संग्रहाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार भास्कर जाधव, आमदार रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे : शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वातावरण गेल्या आठ महिन्यापासून चांगलेच ढवळून निघत आहे. शिवसेना पक्षफुटीच्या मागे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना फुटाच्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे निष्ठावंत दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट आला होता. त्यामध्ये त्यांचा एक संवाद आहे 'गद्दारांना क्षमा नाही' या संवादाची जोरदार चर्चा ठाकरे गटात सुरू असतानाच, उल्हासनगर येथिल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी सत्तांतरानंतर घडलेल्या घडमोडींवर आधारित वेळोवेळी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांपैकी ४५ निवडक लेखाचा लेखसंग्रह पुस्तक रूपात काढला. १२६ पानाचे हे पुस्तक आहे. हे लेख आधारित पुस्तक महाराष्ट्रभरातील निष्ठावंत शिवसैनिकांचे मनोबल वाढवणारे व बंडखोरांचे वाभाडे काढणारे असल्याचे हे लेख असून या लेखसंग्रहास प्रकाशनपूर्व नोंदणीही देखील प्रचंड प्रमाणात झाल्याची माहिती दिलीप मालवणकर यांनी दिली आहे.
आवृत्ती हातोहात संपेल: या लेखसंग्रहाचे समर्पक मुखपृष्ठ दिलीप मालवणकर यांच्या संकल्पनेतील असून ते सुप्रसिध्द चित्रकार सुरेश श्रीमणी यांनी साकारले आहे. डाॅ. शिवरत्न शेटे यांची प्रस्तावना लाभली. या संग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपेल व दुसरी आवृत्ती पुढील महिन्यातच काढावी लागेल, असे मत लेखक व प्रकाशक मालवणकर यांनी व्यक्त केले आहे.
पुस्तकामागची अशी आहे कहाणी: दिवंगत आनंद दिघे ह्यात असताना मार्च १९८९ साली ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडूण आले होते. त्यावेळी शिवसेनेने जनता पक्षासोबत युती करत महापौर पदावर दावा केला. मात्र महापाैर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. शिवाय उपमहापौर पदही दोन मताने गेल्याने दोन्ही पदावर त्यावेळी काॅंग्रेसने बाजी मारली होती. मात्र यातूनच शिवसेनेचे नगरसेवक फुटले होते, हे स्पष्ट दिसून येऊ लागले होते. त्यावेळी दिवंगत आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. या घटनेवर बोलताना त्यांनी 'गद्दारांना माफी नाही' असे म्हटले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा खून करण्यात आला होता. त्यांनीच काॅंग्रेसला मतदान केले होते. यामुळे दिवंगत आनंद दिघेंनी त्यांचा खून केला. या प्रकरणामध्ये दिवंगत आनंद दिघेंना टाडा लावण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर ते जामिनावर बाहेर होते. विशेष म्हणजे, हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. मात्र दिघेंच्या मृत्यूपर्यंत हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, असे सांगितले जात आहे.