मुंबई - जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू आता मुंबईत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी विविध पातळीवर जनजागृती केली जात आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यासह मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांनी पत्रक वाटत तसेच विविध उपक्रम राबवत जनजागृती करावी, असे आवाहन सार्वजिनक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील अनेक मंडळे वर्षभर सार्वजनिक उपक्रम राबवतात. देश व राज्यावर संकटे आली की ही मंडळे धावून जातात. जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर राज्यात व गजबजलेल्या मुंबईतही दाखल झाला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही कोरोनापासून संरक्षण कसे करावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. जनजागृतीपर पत्रकांचे वाटप, विविध मोहिमा राबवण्याबाबत समन्वय समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संदर्भात परसणाऱ्या अफवांकडे लक्ष न देता सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी जे उपाययोजना सुचवल्या आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही समन्वय समितीने केले आहे. तसे पत्रक समितीच्या वतीने काढण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरस: 'मुंबईकरानो घाबरू नका, सूचनांचे पालन करा'