मुंबई - मुंबईतील अनेक भागात रेड लाईट एरिया आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या वारांगणांकडे स्वतःचे ओळखपत्र नाही. त्यामुळे त्यांचे लसीकरण केले जात नाही. अशांसाठी मुंबई महानगर पालिकेकडून विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भांडूपमधील सोनापूर येथील वारांगणांचे लसीकरण मंगळवारी (दि. 13 जुलै) पार पडले.
यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून काही सामाजिक संस्थान एकत्र घेऊन या परिसरामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. यासाठी पालिकेने याच परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारले आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे लसीकरण पार पडले. पहिल्या टप्प्यात अडीचशे महिलांना लस देण्यात आली आहे.
- लसीकरण मोहीम
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली गेली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले. तरीही सध्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.
हेही वाचा - VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गाठलं मंगल कार्यालय, लग्नाच्या दिवशीच नववधूवर गुन्हा दाखल