मीरा भाईंदर (मुंबई)- कृषी कायद्याविरोधात आंदोलन (Farmers Protest Delhi) करताना ज्या शेतकऱ्यांनाचा मृत्यू झाला, त्यांना आर्थिक मदत (Financial Assistance To Relatives Of Died Farmers) करावी. तसेच प्रत्येक राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (UM Ramdas Athavale) यांनी केली. भाईंदरमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिका निवडणुकीत चार ते पाच नगरसेवक येणार
मागील २५ वर्षांपासून रिपाई पक्ष मीरा भाईंदर शहरात कार्यरत आहे. परंतु आजतागायत एकही नगरसेवक नाही. त्यावर बोलताना मंत्री आठवले म्हणाले की, आमचा पक्ष इतर राजकीय पक्षाइतका मोठा नाही. परंतु सामाजिकदृष्टया मोठा आहे. त्यामुळे आम्ही ज्या पक्षासोबत जातो त्यांची सत्ता येते. हा अनुभव प्रत्येक पक्षाला आला आहे. त्यामुळे निवडणुकीत ज्या पद्धतीने रिपाई पक्ष काम करतो, तसं जोडीदार पक्षाने काम केले पाहिजे असा सल्ला त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांना दिला. आमचा एकही आमदार, खासदार नाही. परंतु मी मंत्री आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. यावेळी शेकडो मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करून पक्ष मोठा करा, असे आवाहन केले.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे
देशातील मुस्लीम समाजाकडून आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी केली जात आहे. हिंदू समाजाला आरक्षण मिळत असेल तर, देशातील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सर्व मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे रिपाई उभी आहे, असेही ते म्हणाले.