मुंबई - हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातदेखील विविध ठिकाणी या संतापजनक घटनेचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात येत आहेत.
बुलडाणा - घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी देऊळगाव राजा येथील महिला आणि विद्यार्थिनींनी तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. घटनेच्या चौकशीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करून सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश आणि फौजदारी वकिलांचा त्यामध्ये समावेश करण्यात यावा, पंधरा दिवसांच्या कालावधीत न्यायालयाने निर्णय द्यावा आणि या काळात आरोपींना जामीन होता कामा नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सोलापूर - उडान फाऊंडेशनतर्फे बार्शी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. अशा घटनांमधील नराधमांना केवळ अटक करुन प्रश्न सुटणार नाही. त्यांना भर चौकात फाशी दिल्यावरच आरोपींच्या मनात भीती बसेल. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी उडान फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
नाशिक - हैदराबाद येथील घटनेचा निषेध करत आरोपींना भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी दिंडोरी येथील विविध महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी, ज्योती देशमुख, भारती गवळी, संगीता राऊत, मीना पठाण, मीराबाई भरसट आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत महिलांनी नायब तहसीलदार संगमित्रा बाविस्कर यांना निवेदन दिले.
ठाणे - उल्हासनगरमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच आपल्या तोंडाला काळे फासून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. महिलांची सुरक्षा जिथे वाऱ्यावर आहे अशा समाजात आम्ही वावरतो त्याची आम्हाला लाज वाटते, असे म्हणत विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच तोंडाला काळे फासले. या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी अशी घोषणाबाजी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. स्त्रीमुक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदविला. सरकारने अशा आरोपांविरोधात कठोर कायदे बनवण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
नांदेड - विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन दामिनी ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या वतीने आज शहरात मानवी साखळी करुन या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी सर्व सहभागी नागरिकांनी काळ्या रिबीन बांधल्या होत्या. जुना मोंढा पासून निघालेली ही मानवी साखळी नंतर शहराच्या विविध भागत गेली होती.
हेही वाचा - ...तर आम्ही कायदा हातात घेऊ; पुण्यातील विद्यार्थिनींसह महिलांनी पंतप्रधानांना पाठवली १०० पत्रे
अमरावती - ही घटना देशाला काळीमा फासणारी आहे. ज्याप्रमाणे सिनेमात पोलीस आरोपीला जमावाच्या स्वाधीन करून देतात तशी वेळ वास्तवात आली असून अत्याचार करणाऱ्यांना पोलिसांनी गर्दीच्या स्वाधीन करावे, अशी मागणी नारी सुरक्षा मंचाने केली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव - बुधवारी जळगावात पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. सुमारे 250 ते 300 महिला व पुरुष डॉक्टर्स या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा संकुल, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यचौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
वाशिम - सदर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदनही देण्यात आले. तसेच अनसिंग बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला.