मुंबई - मकरसंक्रांतनिम्मित ठिकठिकाणी महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करत असतात. मात्र, आज (दि.14 जाने.) भांडुपच्या सोनापूर विभागात देवामृत फाउंडेशनतर्फे वारांगना महिलांसोबत संस्थेच्या महिलांनी हळदी कुंकू समारंभ केला. यावेळी विविध उपक्रम देखील संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले.
देहविक्री करणाऱ्या महिलांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा. या महिलाही समाजाचा एक घटक आहे, याची जाणीव त्यांना व्हावी. यासाठी समाज प्रबोधनाच्या उपक्रमातून या महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून देहविक्रीच्या शापातून या महिला मुक्त होतील. या सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविला जात आहे. देहविक्री व्यतिरिक्त या महिलांना उपजिवीकेचे अन्य साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे पूनर्वसन होऊन समाजात त्यांनाही सन्मानाने जगता यावे यासाठीच देवामृत फाऊंडेशनच्या वतीने वारांगनांसाठी मकरसंक्रातीच्या निमित्ताने 'सन्मान तुझ्या स्त्रीत्वाचा' हा सामाजिक उपक्रम राबविला गेला. यावेळी या महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, असे देवामृत फाउंडेशनच्या प्रिया जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - महापौर शब्द पाळा, चोर बाजार व्यापाऱ्यांचे महापौर बंगल्यावर आंदोलन