मुंबई : आज 1 मे महाराष्ट्र दिन. आजच्याच दिवशी 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज राज्यभर हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जात असताना आता एक नवीन मागणी पुढे येऊ लागली आहे. राज्यात सध्या असणाऱ्या 36 जिल्ह्यांचे विभाजन करून 58 जिल्हे करण्याचा प्रस्ताव समोर येतो आहे.
अनेक गावे विकासापासून दूर : 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्यापैकी अनेक जिल्हे हे लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही मोठे होते. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी जनतेची गैर सोय होऊ लागली. त्यानंतर आतापर्यंत राज्यात 10 नव्या जिल्ह्यांची भर पडून राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे. मात्र आजही अनेक गाव खेड्यातून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवास करावा लागतो. प्रगतिशील महाराष्ट्रात आजही अनेक गावे ही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यासाठीच आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेचे 26 जिल्हे : ठाणे, कुलाबा (आत्ताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद (आत्ताचे नाव छत्रपती संभाजीनगर), परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चंद्रपूर (पूर्वीचे नाव चांदा) हे 26 जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्यात होते.
1981 पासून आत्तापर्यंत 10 जिल्ह्यांची भर: या जिल्ह्यातून हे नवे जिल्हे तयार झाले - रत्नागिरी - सिंधुदुर्ग (1 मे 1981), छत्रपती संभाजीनगर - जालना (1 मे 1981), धाराशिव - लातूर (16 ऑगस्ट 1982), चंद्रपूर - गडचिरोली (26 ऑगस्ट 1982), बृहन्मुंबई - मुंबई उपनगर (1 ऑक्टोबर 1990), अकोला - वाशिम (1 जुलै 1998), धुळे - नंदुरबार (1 जुलै 1998), परभणी - हिंगोली (1 मे 1999), भंडारा - गोंदिया (1 मे 1999), ठाणे - पालघर (1 ऑगस्ट 2014).
आणखी २२ जिल्हे प्रस्तावित :
- नाशिक - मालेगाव, कळवण
- पालघर - जव्हार
- ठाणे - मीरा भाईंदर, कल्याण
- अहमदनगर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
- पुणे - शिवनेरी
- रायगड - महाड
- सातारा - माणदेश
- रत्नागिरी - मानगड
- बीड - अंबेजोगाई
- लातूर - उदगीर
- नांदेड - किनवट
- जळगाव - भुसावळ
- बुलडाणा - खामगाव
- अमरावती - अचलपूर
- यवतमाळ - पुसद
- भंडारा - साकोली
- चंद्रपूर - चिमूर
- गडचिरोली - अहेरी
हेही वाचा : Vajramuth Rally : 'वज्रमूठ' सभांचा परिणाम निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल, राजकीय विश्लेषकांचे मत