मुंबई - राज्य सरकार हे खासगी रुग्णालयात होणारी लूट आणि आर्थिक शोषण यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही दररोज लुटीच्या वेगवेगळ्या तक्रारी येतच आहेत. सर्व खासगी रुग्णालय माफक दर असल्याचे सांगत असले तरी छुप्या दरामुळे रुग्ण आणि कुटुंब असहाय्य होतात. म्हणून खासगी रुग्णालयातील रिसेप्शन किंवा बाहेर बिलाची रक्कम डिस्प्ले करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, रुग्णालयातील रिसेप्शन किंवा बाहेरील बाजूस बिलाची रक्कम डिस्प्ले करणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थापन खोटी माहिती देणार नाही. यामुळे सर्वसामान्यांना सत्यपरिस्थिती लक्षात येईल. आज मंत्री, अधिकारी रुग्णालयात अचानक जातात आणि कारणे दाखवा नोटीस देतात. पण 'ऑन दी स्पॉट' कार्यवाही होत नाही. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाची मुजोरी वाढते, असे गलगली यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा