मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेला वक्तव्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केलेला आहे. सातत्याने राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
वक्तव्यामुळे सगळीकडे संताप: याआधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आणि पुन्हा एकदा त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळेच राज्यपाल करत असलेल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी दखल घ्यावी असं वक्तव्य शरद पवार यांनी केल आहे.
राज्यपालाची पदाची जबाबदारी: संभाजीनगर येथे दीक्षांत कार्यक्रमानंतर केलेल्या वक्तव्य नंतर राज्यपाल आता त्या वक्तव्याबाबत सारवा सराव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता सारवा सराव करणे म्हणजे राज्यपालांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा टोला ही शरद पवार यांनी लगावला आहे. राज्यपाल एक संस्था आहे. या संस्थेची प्रतिष्ठा असते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्य आणि वक्तव्य करून राज्यपालांनी मर्यादा ओलांडले आहेत. त्यामुळे कोश्यारी यांच्यासारख्या व्यक्तींकडे राज्यपालाची पदाची जबाबदारी देणे योग्य नाही असा इशाराही केंद्र सरकारला शरद पवार यांनी दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी राज्यपाल यांचे कान टोचले.
आधी बेळगाव पाणी मुद्द्यावर चर्चा करा: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली अक्कलकोट येथील 40 गावांबाबत वक्तव्य केलं आहे. मात्र महाराष्ट्राचे आधीपासूनच बेळगाव निपाणी कारवार या सीमा भागाबाबत मागणी आहे. याबाबत कर्नाटक सरकारने बोललो पाहिजे. यासोबतच या मुद्द्यांबाबत कर्नाटक सरकार चर्चा करणार असेल, तर त्यांना कोणती गावे द्यायची याबाबत चर्चा होऊ शकते. असंही आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले आहेत.
ज्योतिषावर माझा विश्वास नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना ज्योतिषाकडे आपला हात दाखवले असल्याचे चर्चा सुरू असताना यावर आता शरद पवार देखील म्हणाले आहेत. ज्योतिषावर आपला विश्वास नाही. मात्र आसाममध्ये काय घडलं, हे संपूर्ण देशाला माहित आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवणे या सर्व गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे विज्ञानवादी विचार करणारा राज्य आहे. मात्र आता या नवीन गोष्टी पाहिला मिळत आहेत, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.