मुंबई - 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे मुंबई येथील बेस्टची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची व इतर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच नियमित कोविड चाचणी होत नाही. याशिवाय मुंबईत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनसुद्धा महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता मुंबईत बेस्टच्या सेवेवर "पहले लस फिर बेस्ट की बस" हा पवित्रा आम्ही घेतला आहे', अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.
'एसटी कामगार असुरक्षित'
'बेस्ट वाहतुकीकरिता दुर्धर आजार व ५५ वर्षावरील कर्मचारी पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना आहेत. तरीही स्थानिक पातळीवर अशा कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतुकीला जाण्यासाठी जबरदस्ती केली जाते. न गेल्यास आरोपपत्र, निलंबन, इत्यादी प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. बेस्ट वाहतुकीला पाठविताना सॅनिटायझर, मास्क पुरविले जात नाही. एका बसमधून ४० ते ४५ कर्मचारी आगारातून मुंबईला पाठविले जातात. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. बेस्ट वाहतुकीवरून आल्यावर काही ठिकाणी कोरोना टेस्ट केली जात नाही. टेस्ट केल्यास रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा होत आहे. तरीही कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून जिवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. परिवहन मंत्री महोदय एस.टी.कर्मचाऱ्यांचा 'कोरोना योद्धा' म्हणून मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात. मात्र, या योद्ध्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत आम्ही अनेकदा महामंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. तरीसुद्धा गैरसोईमध्ये कोणत्याही कायमस्वरूपी सुधारणा झालेल्या नाहीत', असे संदीप शिंदे यांनी सांगितले.
'कर्मचाऱ्यांना निकृष्ट जेवण'
'बेस्ट वाहतूक करताना सुरुवातीला कर्मचाऱ्यांना निकृष्ट जेवण देण्यात आले. त्यात अळ्या सापडल्यानंतर नाश्ता व दोन वेळेच्या जेवणासाठी केवळ २२५ रुपये इतका तुटपुंजा भोजन भत्ता सुरू केला गेला. बेस्ट वाहतुकीसाठी मुंबईत आल्यावर जर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्याच्यावर मुंबईत उपचार न करता परत गावी पाठविले जाते. हे अतिशय गंभीर आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे आहे. एका आजारी कर्मचाऱ्याला तर स्वतः खर्चाने रूग्णवाहिकेतून गावी जावे लागले आहे. मुंबई येथे बेस्ट वाहतुकीसाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यापूर्वी लसीकरण करणे आवश्यक असताना ते केले जात नाही. मुंबई बेस्ट वाहतुकीमुळे अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर काही कर्मचारी मृत पावले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क प्रवासी जनतेशी येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे अत्यावश्यक आहे', असेही शिंदे यांनी म्हटले.
'१० दिवसांचा अल्टीमेट'
'बेस्ट वाहतुकीमध्ये येणाऱ्या अडचणी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्या आहेत. मात्र त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना काळात सर्व आस्थापना बंद असताना एसटी कर्मचारी मात्र जोखीम पत्करून मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य बजावत आहेत. इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काम करताना ज्या सोई, सवलती व संरक्षण पुरवले जाते, ते मात्र एसटी कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. लसीकरण नाही, राहण्याच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग नाही, कोरोनाची चाचणी नाही, स्वत:चे संरक्षण नाही, कुटुंबाचे संरक्षण नाही. रोजच्या रोज मृत्यूची वाढती संख्या व इतर सर्व बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे. येत्या १० दिवसात कामगारांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही तर येणाऱ्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये महामंडळाविरोधात उद्रेक होईल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील', असा इशारा कामगार संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
'कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण'
तर, 'बोरीवलीला एसटी कर्मचाऱ्यांना समस्या येत होत्या. मात्र, त्या समस्यांचे समाधान करण्यात आले आहे. मुंबईमध्ये बेस्टच्या वाहतुकीला आलेल्या सर्व कामगारांची योग्य व्यवस्था केली आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरणही युध्द पातळीवर सुरू आहे', असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'गारुडी आणि पुंगीवाले सत्तेच्या टोपल्यांवर बसून पुंग्या वाजवीत आहेत'
हेही वाचा - जामखेडमध्ये दहा दिवसांच्या कडकडीत जनता कर्फ्यूचा निर्णय