मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या पवईच्या हॉटेल रेनिन्सन्समध्ये ठेवण्यात आले आहेत. राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच एक व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओत साध्या वेशातील पोलिस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका आणि चर्चेची माहिती खबऱ्यांमार्फत बाहेर पोहोचवत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा - शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य - जयंत पाटील
राज्यातला सत्तासंघर्ष टीपेला पोहोचला आहे. आमदार फुटू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे. परंतू आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये साध्या वेशातील पोलिसांचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हे पोलीस आपल्या खबऱ्यांमार्फत तेथे होणाऱ्या हालचालींची माहिती बाहेर देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आमदारांना लवकरात लवकर दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे
शनिवारी रात्रीपासून पवईच्या रेनिन्सन हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरक्षेच्यादृष्टीने ठेवण्यात आले होते. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आमदारांसोबत बैठक घेवून चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठकीत अजित पवार यांनी केलेल्या बंडा विषयी चर्चा केली असून अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान काही अनोळखी व्यक्ती या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमधील माहिती बाहेर पुरवत असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच काही साध्या वेशातील पोलीस कर्मचारी हॉटेलमध्ये आढळून आले. त्यामळे रात्री उशीरा आमदारांना हॉटेल रेनिन्सन्समधून हलिवण्यात आले असून त्यांना हॉटेल हयातमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नेण्यात आले आहे.