मुंबई - मुंबईहुन-कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्सप्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या रेल्वेत ९ गर्भवती महिला असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या.
सर्व गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान, एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्या महिलेच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी मागणी केली होती. त्यानंतर त्यांना त्वरित मदत देत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून २० डॉक्टरांच्या चमूला तिच्या मदतीला पाठविण्यात आले होते. ते घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवाश्यांना बचाव पथकाने सुरक्षित गाडीच्या बाहेर काढले आहे. प्रवाश्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. गाडीतल्या गरोदर महिलांनाही आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांनाही सुरक्षित स्थळी आणण्यात आले असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.