मुंबई - आज (मंगळवार) गणेश भक्त दीड दिवसांच्या आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत. मात्र, त्याचवेळी समुद्राला मोठी भरती येणार असल्याने गणेश भक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गणेशोत्सव मोठा वाजत गाजत साजरा केला जातो. अनेकांनी घरांमध्ये काल (सोमवार) श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना केली आहे. मुंबईत दीड दिवसाचे गणपती मोठ्या प्रमाणात असतात. आज त्यांचे विसर्जन केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव बनवले असले तरी विसर्जन करण्यासाठी भक्तांकडून विशेष करून समुद्राचा वापर केला जातो.
समुद्राला भरती असल्यावर पालिकेकडून खास करून पावसाळ्यात इशारा दिला जातो. यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळ्यात २८ दिवस समुद्राला मोठी भरती होती. गेला महिनाभर मुंबईत पाऊस न पडल्याने समुद्रातील भरतीची भीती कमी झाली होती. परंतु गणेश आगमनापासून मुंबईत पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुन्हा समुद्रातील भरतीचा धोका निर्माण झाला आहे.
आज मंगळवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्याच वेळी दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. यावेळी ४.५४ मीटरच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. भरतीच्या काही तास आधी व काही तास नंतर समुद्रामधील पाण्याची पातळी वाढलेली असते. याचवेळी अनेक गणेश भक्त समुद्रात गणेश विसर्जन करणार आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गणेश भक्तांनी काळजी घ्यावी व पालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.