मुंबई - पूर्व मुंबई उपनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सकाळपासून उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होते. नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पूर्व मुंबई उपनगर घाटकोपर विक्रोळी असल्फा या भागांमध्ये पावसाच्या रिमझिम आणि जोरदार सरी बरसल्या आहेत. पुढील काही तास हवामानाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
'या' भागात बरसल्या सरी
मुंबईतील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून पूर्व उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होत आहे, त्यामुळेच राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परीसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. 1 जूनला मान्सूनचे आगमन होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. परंतू त्यानंतर वाऱ्यांची बदललेली दिशा आणि पूरक वातावरणामुळे रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा अवधी लागणार आहे.
हेही वाचा-रखडलेल्या जलकुंभाच्या कामाची मंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी