मुंबई- बोरीवली येथील भगवती रुग्णालयातील गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला अतिदक्षता विभाग येत्या सोमवारपासून तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. येथे तातडीने बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच रुग्णालयात सध्या तुटवडा असलेली इंजेक्शन सुद्धा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही दरकेर यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्याची मागणी दरेकर यांनी आयुक्त इकबाल चहल यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर सोमवारपासून रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले, असे दरेकर यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी बोरीवली येथील भगवती महानगरपालिका रुग्णालयाला भेट दिली. यावेळी दरेकर यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा, उपलब्ध औषधे व इंजेक्शन आदी आरोग्य यंत्रणांची माहिती घेऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक आमदार मनिषाताई चौधरी, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक जितेंद्र पटेल, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, भाजपचे दहिसर मंडल अध्यक्ष अरविंद यादव, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, भगवती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. वाडे, सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये खास करून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. यासाठी सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालयांमधील अपुरी व्यवस्था हे मुख्य कारण आहे. जर सरकारी रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये अद्यावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज ठेवली, तर खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण जाणार नाहीत. पण बोरीवलीत मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून लूट होताना दिसत आहे. भगवती रुग्णालयात दोन वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील अतिदक्षता विभाग सुरू झाले नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला. भगवती रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
एका बाजूला जनतेचा पैसा दोन वर्ष त्या मशीनवर खर्च केला. त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. गेले दोन वर्ष यंत्रणा उपलब्ध असताना सुद्धा हा विभाग सुरू करण्यात आला नाही. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. या सर्व गोष्टी आजच्या भेटी दरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या व तातडीने आयुक्तांशी संर्पक साधला. स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी ६ जूनला संबंधित विषयावर लक्ष वेधण्यासाठी पत्र दिले होते. त्यालाही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. एखादा आमदार जेव्हा 10 ते 15 दिवसाआधी या गंभीर विषयावर लक्ष वेधतो. त्याची साधी दखलही घेता येत नसेल तर हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे रुग्णालयात जो विस्कळीतपणा आणि हेळसांडपणा झाला आहे, तो अशाच बेजबाबदार व्यवस्थेमुळे झाल्याची टीका दरेकर यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत येत्या सोमवारी भगवती रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू व्हावेत, असे अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना सांगितले आहे. त्यानंतर सोमवारी हे विभाग सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत. हा विभाग सोमवारी सुरू होईल. यामध्ये आणखी दहा खाटा वाढविण्यात येतील, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
भगवती रुग्णालयात टॉसीझिलीझॅप या इंजेक्शनचा तुटवडा आहे. उपनगरात १ हजार इंजेक्शनची आवश्यकता असताना आज फक्त ४५ इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे, ही बाब निदर्शनास आणल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. पण इंजेक्शनासाठी पंतप्रधानांना सांगावे लागत आहे हे दुर्दैवी आहे. या इंजेक्शनची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून हे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असतानाही आमदार मनिषा चौधरी यांनी ते इंजेक्शन बाजारातून उपलब्ध करून दिले. याचा अर्थ या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे अथवा जाणीवपूर्वक साठवणूक केली जातेय का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी दरेकर यांनी केली.
भगवती रुग्णालयात रेमेडीसीवर्ड या टॅबलेटचा तुटवडा असून ही टॅबलेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती असताना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी का थांबावे लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी बोललो. त्यांनी या टॅबलेटची नोंद करून घेतली असून ही टॅबलेट तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.
भगवती रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी उपस्थित केलेल्या विषयांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मुख्यमंत्र्याशी रुग्णालयातील समस्येविषयी चर्चा केली आहे. भगवती रुग्णालयातील ते इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती दरेकर यांनी केल्यानंतर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.