मुंबई - कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासूनचे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहेत. दिवाळीचा सण आला आहे, त्यामुळे त्यांना वेतन देणे गरजेचे आहे. इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार आहे म्हणून एसटी महामंडळ 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाने कोणतीही मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज काढू नये. संकटात असलेल्या महामंडळाला राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर -
एसटी महामंडळ २ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे ९०० कोटी रुपयांचे थकीत वेतन देणार असल्याचे समजले. एसटीची मालमत्ता गहाण ठेवून कर्मचाऱ्यांचे पगार देणे, हे महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभणारे नाही. राज्य सरकारची कर्ज उभारण्याची क्षमता आहे. त्यामुळे सरकारनेच कर्जरोखे काढवेत व महामंडळाला पैसे उभे करून मदत द्यावी. त्यासाठी एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवू नये, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
हेही वाचा - एसटीवर आगार अन् स्थानके गहाण ठेवण्याची वेळ; कर्ज काढून देणार कर्मचाऱ्यांचे वेतन
काय म्हणाले होते परिवहनमंत्री अनिल परब -
दिवाळी सण आल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे गरजेचे आहे. म्हणून परिवहन विभागाने सरकारकडे 3 हजार 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याचीही आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागानेच कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. २ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल. बँकांकडे एसटीची पत चांगली आहे. कर्जासाठी बँकांकडे एसटी आगार आणि स्थानके गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीची ही मालमत्ता केवळ विशिष्ट काळासाठी त्यांच्या ताब्यात राहील. पैसे दिल्यानंतर आपली मालमत्ता सोडवण्यात येईल, असेही परब म्हणाले.